प्रेमगीत

साथ ही तुझी, प्रिये जणू गारवा
तप्त ही धरा, अन् तू चांदवा ।।

विशाल नभासारखे हृदय हे तुझे
सामावून घेशी तू अनंत अपराध माझे
चिमण्या आपुल्या घरट्याला,आधार तुझा लाभला
राजा राणीचा संसार, तुझ्यामुळेच सजला ।।

तुझ्यामुळे मी शिकलो, प्रेमाची परिभाषा
तूच माझी स्फूर्ति अन् जगण्याची आशा
नीरस जीवनगाणे पण तू सुरेल पावा
साथ ही तुझी, प्रिये जणू गारवा ।।

ऐक ग साजणी, प्रसन्न या क्षणी
हातात हात तुझा अन् ओठी प्रेमगाणी
लटके तू चिडावे अन् मी तुला मनवावे
हळूच मग हसुनी तू मजजवळ यावे ।।

साथ ही तुझी, प्रिये जणू गारवा
तप्त ही धरा, अन् तू चांदवा ।।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ