चारोळी

चारोळी

चार भिंती वर छप्पर
दुनियेच्या नजरेत हेच घर
माझ्या मनातलं घर खरतर
भावनेच्या ओलाव्यातले नाते सुंदर ।
---------------------------------
शब्द नव्हे तर स्पर्श बोलतात
मनातील भावना नजरेतून कळतात
जखम एकाला अन् दुःख दुसर्‍याला
भावनिक नाते यालाच तर म्हणतात ।
-----------------------------------
जरी शांत माझे नयन तरी मनात आणीबाणी
अबोल माझी प्रिती समजून घेशील का साजणी
निजध्यास तुला बघण्याचा जन म्हणती यास विपायण
निजगूज मम अंतरीचे घायाळ करती तव नयनबाण

अतुल

निजध्यास - छंद
विपायण - वेडेपणा

म्हणतात स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
मला तर वाटते लोक बरळतात काही बाही
स्वर्गासाठी जर माणूस पडायला हवा गार
तर जगणे म्हणजे काय नरकाचे द्वार ।
-----------------------------------
वार्‍याच्या लहरीवरून तरंगत शब्द आला
डोळ्यातून थेट हृदयाला जाउन भिडला
हृदयाची वाढवली धडधड त्याने
प्रेम म्हणतात मला , म्हणाला आनंदाने ।
-----------------------------------
आयुष्याचं रहाटगाडगं गोल गोल फिरतं
जिथून होते सुरवात, आयुष्य तिथेच संपत
माहित असूनदेखील लालसा सुटत नाही
निरर्थक जगल्यामुळे आयुष्याला अर्थ रहात नाही ।
-----------------------------------
मनदर्पण माझे आरसा दाखवते
स्वतःचे प्रतिबिंब मनात उमटते
स्व ला जरी मी दुनियेपासून लपवतो
बिनदिक्कत मनदर्पण मला स्व दाखवतो ।
-----------------------------------
जरी मी काही सांगितले तुला
वा लिहून टाकले पोस्टात पत्राला
ही सगळी आहे शब्दांची भेळ
भावना झाल्या आहेत शब्दांचा खेळ ।
-----------------------------------
नजरेला नजर, ओठावर हसू
मनातल्या किती गोष्टी मोजत बसू
हातात हात, हलकासा स्पर्श
नुसत्या कल्पनेनीच झाला मनाला हर्ष
-----------------------------------
दिव्याच्या प्रकाशात सावली दिसते
अंधारात माणूसपण दिसत नाही
भावनांच्या खेळात आयुष्य फसते
वावटळीत उडालेली धूळ जणू काही
-----------------------------------
अप्रत्यक्ष जोडणी दिसली प्रत्यक्षात
भावना मनात अन् अश्रु नयनात
-----------------------------------
आश्चर्य वाटले मला
तुला माझे प्रेम कसे नाही जाणवले
आणि तुझ्याकडे पाहिले
तर तुझ्या डोळ्यात माझेच प्रतिबिंब उमटलेले
-----------------------------------
काय म्हणावं या मनाला
विचार सतत तुझाच करतं
रहात माझ्या शरीरात असलं
तरी फिरत मात्र तुझ्याबरोबरच असतं
-----------------------------------
बुद्धि आणि भावना
यांची जोडी दर्दी आहे
म्हटलं विचार करून मन मोकळे करावे
तर मनात विचारांची गर्दी आहे
-----------------------------------
तू आहेस
म्हणून मी आहे
नाहीतर जगण्यात
प्राणाची कमी आहे
-----------------------------------
दोस्तीमधे
मन साफ ठेवायच असतं
चुक झाली
तरी माफ करायच असतं
-----------------------------------
एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं
अन् जगण्याची लालसा सुटायला मनुष्याला आयुष्य पण अपुरं पडतं
-----------------------------------
नाती म्हणजे आहेत कोडी
कडवटपणातही असते गोडी
एकटेपणातसुद्धा जमते जोडी
फुटत असतात भावनांच्या लडी
-----------------------------------
मनाला मी खुप समजावले
पळायचे नाही असे ठणकावले
तू आलीस अन् कळेना काय झाले
कळलेच नाही ते कधी तुझे झाले
-----------------------------------
माणसाला माणसावर
प्रेम करायला इतके आवडते
की आता रस्त्यावर बाहेर पडायला
मुंगीसुद्धा घाबरते
-----------------------------------
राजकारण्यांना लोकांच्या
बुद्धीमत्तेचे कौतुक वाटले
म्हणून शिक्षणाला त्यांनी
राजरोस दुकानात बसवले
-----------------------------------
नोकरदार स्त्रिया
पैसा घरी आणतात
आणि गृहिणी घराला
घरपण देतात
-----------------------------------
आपल्यापेक्षा अथक काम
गृहिणी करते
घड्याळाच्या मनाला
सतत ही गोष्ट सलते
-----------------------------------
तुझ्या उन्नतीसाठी
आयुष्य लावले पणाला
बापाचे हृदय तू
ओळखशील का रे मुला
-----------------------------------
स्वतःपेक्षा सतत
इतरांचीच काळजी जास्त
त्यांचे जीवन केलेस अनमोल
अन् स्वतःचे केलेस स्वस्त
-----------------------------------
माझ्या जीवनात आलीस
अन् माझे विश्व टाकलेस व्यापून
अशी केलीस माझी स्थिती
माझे मी पण गेले संपून
-----------------------------------
स्वतःचे पाप कमी करायला
लोक देवळात जातात
भिकार्‍यांना दान देउन
जणू परत पाप करायचा मक्ता घेतात
-----------------------------------
माणसाचे प्रतिबिंब
दिसते आरशात खुलून
मनाचे पदर
डोळे दाखवतात उलगडून
-----------------------------------
मनात उठती तरंग
तुझ्या आठवणींचे ग साजणे
शब्दात मांडल्या भावना
अन् लोकांना वाटले गाणे
-----------------------------------
कधी तू माझ्या कवितेच्या ओळी
कधी भावना व्यक्त करणारी चारोळी
तुझाच विचार सतत मनात वेळी अवेळी
तू हळद कुंकू अन् मी शुभ्र रांगोळी
-----------------------------------
मन हे माझं गंमतच करतं
सुखात मी असताना ते दुःखातच रमतं
-----------------------------------
जसा असतो फुलाबरोबर सुगंध
वा पहिल्या पावसाबरोबर मृदगंध
जसा घननीळा असे बासरीविना अपूर्ण
माझे जीवन तुझ्यामुळेच आहे पूर्ण 
-----------------------------------
पूर्वी थोर नेते करायचे एकसंध देशाची आखणी
आजचे नेते करत आहेत त्या थोर नेत्यांची विभागणी
-----------------------------------
झाडांचा हिरवागार रंग मनाला किती सुखावतो !
तोच हिरवा रंग झेंड्यावर का बरं मन दुखावतो ?
-----------------------------------
मन हवं घट्ट, पक्क्या भिंतीसारखं
अन्यथा कसे जगाल, होता आपलं माणूस परकं
-----------------------------------
शब्दांचं सामर्थ्य लेखनामुळे कळतं
उत्तम लेखन मनाला भावतं
तप्त वसुंधरा जशी पावसामुळे शांत होते
तद्वत सुंदर साहित्य मनाला तृप्त करते
----------------------------------------
तू स्वप्नात येणार
ह्या कल्पनेनीच मला मुंग्यांची भिती वाटते
कारण तुझ्या विचारांच्या चाहूलीनेच
माझ्या अंगावर मुंग्याची गर्दी होते

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

आयुष्यरुपी भेळ