जग हे सुंदर आहे

जग हे सुंदर आहे

अजूनही टिकून आहे माणसातील माणुसकी
नात्यामधे गोडवा अजूनही आहे बाकी
मनाला करतो प्रसन्न पहाटेचा गारवा
तरूण हातात अजूनही दिसतो बघ पावा
ऐकू येतात अजूनही कबीराचे दोहे
खात्री मग पटते, खरचं जग हे सुंदर आहे ।

धडपडताना दिसतं कोणीतरी दुसर्‍यासाठी
निसर्गावर प्रेम करतं जीवापाड लोकांसाठी
ओले होतात डोळे अजूनही बघून वाट 
पंक्तिमधे बसायला अजूनही दिसतो पाट
नाश्त्याला आवर्जून मिळतात कांदेपोहे
खात्री मग पटते, खरचं जग हे सुंदर आहे ।

वेगळ्या वाटा चोखाळते आनंदाने तरूणाई
आई गाते बाळासाठी अजूनही अंगाई
दाखवतात कधी मुले अफलातून हुशारी
कर्तृत्व ते बघून थक्क होते दुनिया सारी
आजच्या जगात कर्तृत्वाला मान मिळतो आहे
खात्री मग पटते, खरचं जग हे सुंदर आहे ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ