निशा

पहाट म्हणाली रात्रीला
किती ग तू काळी
लोकांना घाबरवतेस
वेळी अवेळी

तुझ्यामुळे होतात
जगात कृष्णकृत्ये
तुझ्यामुळेच जमतात
झाडावर भुते

तुझ्या मिट्ट काळोखात
वाईट लोकांची मजा
तू व्हायला पाहिजेस
लोकांच्या आयुष्यातून वजा

का बरे तू आलीस
ह्या सुंदर जगात
बसलीस का नाहीस
मजा करत स्वर्गात

निशा म्हणाली हसून
माझा रंग काळा
पण लोक ज्याला पूजतात
तो कृष्ण होता सावळा

नको अशी तू
हुशार समजूस स्वतःला
माझ्यामुळेच तर तानाजीने
कोंढाणा सर केला

वाईट कृत्ये करायला
लोकांना फरक नाही पडत
जग हे पुढारलेले
माझी वाट नाही बघत

लोकांना विश्रांती
माझ्यामुळेच तर मिळते
तुझे महत्व त्यांना
माझ्यामुळेच तर कळते

मी आहे म्हणून तुला
जगात ह्या वाली
नको टेंभा मिरवूस कारण
गर्वाचे घर खाली

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ