गणेशा तू आहेस विद्येची देवता
मग लोकांमधे का बुद्धीची कमतरता
तुझा जन्मदिवस करतात ते साजरा
हे दहा दिवस शांतता विसरा ।

त्यांचे का नाही तू कान उपटत
कसे वागावे हे त्यांना का नाही शिकवत
हे दहा दिवस त्यांना येते उधाण
तू असतांना का आमचे कंठी येतात प्राण ।

तुला येता जाता ते मिरवत नेतात
रस्त्याचा स्वतःकडे ताबा ते घेतात
हीच का तू त्यांना बुद्धी रे दिलीस
का नाही वेळीच त्यांना शिक्षा तू केलीस ।

तुझ्याकडे उगाच गार्‍हाणे मी मांडतो
आम्हीच तर तुला दहा दिवस कोंडतो
अशी कशी शिक्षा तू सहन करतोस
माजलेल्या लोकांची का नाही जिरवतोस ।

वाईट वाटते सांगायला सदाचार इथला संपला
तुझा उघड उघड बाजार ह्यांनी मांडला
वर्गणीच्या नावाने पैसा केला गोळा
चांगुलपणाचा केला ह्यांनी चोळामोळा ।

तुला निरोप देतांना ह्याच्या येते अंगात
टिळकांना कळाले तर वाटेल उगाच पडलो फंदात
एकतर पृथ्वीवरून तू गायब व्हावेस
नाहीतर ह्यांना कडक शासन करावेस ।

बोल तुला ह्यातले काय आहे पसंत
राज्य आले लुच्च्यांचे कोणी नाही संत
एकटा पडशील अपुरा विचार करून ये
नाहीतर तुझ्या बाबांना बरोबर घेऊन ये ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ