भावना

ठरवले एकदा की काढावा एक दिवस
सानिध्यात आपण आपल्याच भावनांच्या
पुरवावे जरा आपलेच सोस
अन् झुलावे थोडे हिंदोळयावर मनाच्या

जावे उंच आनंदाबरोबर
होउ दे हलके हलके शरीर
फुलपाखरासारखे अनेक रंग
लेउन खुशीत व्हावे दंग

पडद्याआडून हळूच डोकावे
लपत छपत मनातील भिती
कोणी कोणा किती छळावे
अति तेथे होते माती

फुरंगटून बसला कोपर्‍यात
चिडका बिब्बा जाउन दूर
पाहता पाहता सगळ्यांचा
अचानक बदलून गेला नूर

ह्या सगळ्या गोंधळात
शांत एकदम होता ध्यानस्थ
अस्वस्थ होते इतर सगळेजण
हा होता मजेत स्वस्थ

किती हे रंग अन् किती ही रूपे
ह्यांना पाहून मन हरपे
म्हटले तर अवघड आणि म्हटले तर सोपे
सांभाळ करण्यास मनाचे कप्पे

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ