संवाद आणि भावना

संवाद आणि भावना

दोघांचा चालला होता वाद
एक होती भावना अन् दुसरा संवाद
प्रश्न होता कोण श्रेष्ठ
कनिष्ठ कोण आणि कोण ज्येष्ठ ।

भावना म्हणाली माझ्याकडे बघ
अरे! मी आहे म्हणून आहे हे जग
माणूस असो वा असो जनावर
मी आहे म्हणून त्यांचे जगणे खरोखर ।

एकटा असू दे किंवा असू दे अनेक
माझा सर्वत्र वावर नेक
कधी डोळ्यातून कधी स्पर्शातून
व्यक्त व्हावयाचे मार्ग कित्येक ।

माझ्याविना शुष्क नाती
मी अनेकांची जीवनसाथी
तुझा सांग बरं काय उपयोग
मानवाला कसा होईल सहन माझा वियोग ।

हे ऐकून ,संवाद हळूच हसला
म्हणाला अर्थ नसलेला हा वाद कसला
अगं तुझ्यामुळे का कोणी जगला
तुझ्यावर जो विसंबला तो इथे फसला ।

बघ ना, आईचेच असतात शब्द
जे घडवतात बाळाला छान
प्रेयसीला वाटतात प्रियकराचे
I love you हे शब्द महान ।

उदास असो वा असो आनंदी
अडकलेला अथवा असो स्वछंदी
भावना कळवायला प्रत्येकाला शब्दच हवेत
आहे की नाही जग माझ्याच समवेत ।

तिढा हा सुटणं खरेच आहे क्लिष्ट
तुम्हाला काय वाटतं कोण आहे ज्येष्ठ
माझ्यासाठी आहेत दोघे समसमान
एक आहे श्रेष्ठ तर दुसरा महान ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ