भावना

गुलाबाच्या झाडावर
एक कळी उमलली
पानामागून माझ्याकडे
बघून गोड हसली

दिसत होती लबाड
लालचुटूक रंग
पाहत राहिलो तिला
होऊन मी दंग

तिच्यामधे फूल
दडले होते एक
मोहक आणि गोंडस
टपोरे सुरेख

म्हणाली ती मला
मी आवडते का तुला
मी मोठी होतांना
सांभाळशील ना मला

मी पूर्ण उमलल्यावर
मला बाप्पाकडे ने
पायाशी त्यांच्या
मला ठेऊन  दे

माझे भाग्य उजळेल
पुण्य तुला लाभेल
सार्थक दोघांच्या जीवनाचे
आणि मनाला समाधान मिळेल

मन आले भरून
मला शब्द नाही सुचले
बघून कोमल मन
डोळे भरून आले

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ