विलक्षण

विलक्षण

किती बरे छान होईल जर घड्याळ मागे करता आले
ज्याकडे मी दुर्लक्ष केले ते जर मला परत शिकता आले
ऐकून न ऐकलेले बाबांचे सल्ले, कानाडोळा केलेल्या आईच्या सूचना
परत एकदा अनुभवीन आज्जीची माया, मनावर घेईन मी दोस्तांच्या भावना ।

छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद
मनात असून न जोपासलेला आवडता छंद
ऐकीन मन लावून वसंतरावांचे घेई छंद मकरंद
सवाई गंधर्वच्या गायनात होईन मी धुंद ।

पावसाची पहिली सर घेईन मी अंगावर
गरम गरम चहा आणि कांदा भजी त्यावर
निसर्गाच्या सानिध्यात तान घेईन सुस्वर
मनसोक्त भटकेन आनंदात डोंगरावर ।

थंडीच्या दिवसात शेकोटीसमोर बसेन
दोस्तांच्या महफिलीत मी पण असेन
गप्पा गोष्टीमधे मग रात्रसुद्धा संपेन
आनंदाच्या क्षणांना कसे मी विसरेन ।

सणांची येईल एक मज्जाच वेगळी
नातेवाईक मंडळी परत जमतील सगळी
मोठी मोठी माणसे होतील मग लहान
घालतील गोंधळ सणाला येईल जान ।

लिहीता लिहीता एक गोष्ट झाली विलक्षण
घड्याळ नाही गेले मागे पण अनुभवले मी ते क्षण
शरीराने मी वर्तमानातच राहिलो
पण मनाने मात्र भूतकाळात गेलो ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ